Pune Temperature : पुणेकरांनो सावधान! पारा पुन्हा चाळीशी पार; वेधशाळेने पुढील ४८ तासांसाठी दिला ‘हा’ इशारा
Pune Temperature : पहाटेचा गारवा ओसरला अन् दुपारचा उकाडा वाढला; बारामतीत सर्वाधिक तापमानाची नोंद, जाणून घ्या तुमच्या भागातील तापमान.

Pune Temperature – हवामान बदलामुळे मागील आठवडाभरापासून शहरासह जिल्ह्यात घटत्या कमाल तापमानात रविवारी (दि. ४) पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. परिणामी दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असून, आज लोहगाव येथे सर्वाधिक ४० तर जिल्ह्यातील बारामती येथे ४०.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या २४ तासात अर्धा ते एक अंशाने कमाल तापमानात वाढ झाली आहे.
त्यामुळे लोहगाव पाठोपाठ शिवाजीनगर, मगरपट्टा, हडपसर, पाषाण, एनडीए आणि चिंचवड परिसरातही उष्णतेच्या पाऱ्यात किंचीत वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उष्णतेचा पारा ४३ अंशापर्यंत पोहचला होता. परिणामी पुण्यात सुर्यनारायण अक्षरश: आग ओकू लागले होते. त्यामुळे दुपारी बाहेर पडणे म्हणजे शरीर होरपळून अंगाची लाहीलाही होण्यासारखी परिस्थिती झाली होती. उष्माघाताचे रूग्णही वाढले होते.
त्यामुळे दुपारी शहरातील काही रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत होता. गेल्या पाच ते सहा दिवसात हा वाढता पारा हळूहळू खाली आला. त्यामुळे दिवसभरातील उन्हाचा चटका किंचीत कमी जाणवत असला तरी आणि रात्री हवेतील गारव्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा दिला. पहाटेच्या गारवाही चांगला जाणवत होता. आता पुन्हा कमाल तापमानात वाढ होवू लागली असून,
लोहगाव येथे ४०, शिवाजीनगर परिसरात ३८.२, मगरपट्टा ३८.१, हवेली आणि कोरेगाव पार्क ३७.५, एनडीए ३७.१, पाषाण ३६.९, चिंचवड ३६.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसात पुणे शहरासह जिल्ह्यातील आकाश निरभ्र राहील. कमाल व किमान तापमानात किंचीत वाढ होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.





