पुणे – वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटे दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करुन आयएएस पद मिळवल्याचे निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सोडू नये, अशी मागणी दिव्यांग नागरिकांनी राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त डॉ. प्रवीण पुरी यांच्याकडे केली आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांगाचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रमाणपत्र सादर करुन पूजा खेडकर यांनी परीक्षेत वरची श्रेणी मिळवली असल्याची चर्चा आहे. पूजा खेडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालय बळकावले, खासगी गाडीवर सरकारी अंबर दिवा लावला असे अनेक आरोप त्यांच्यावर होत आहेत. या प्रकरणाची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून जिल्हाधिकारी यांच्याकडून याबाबतचा अहवाल मागवला आहे. यासंदर्भात याचसंदर्भात दिव्यांगांच्या संघटनांचे प्रतिनिधी रफिक खान, धर्मेंद्र सातव, सुरेखा ढवळे, सुनंदा बाम्हणे, विष्णूपंत गुंडाळ, सुप्रिया लोखंडे यांनी दिव्यांग कल्याण आयुक्त डॉ. प्रवीण पुरी यांची भेट घेतली. खोट्या प्रमाणपत्रामुळे खरा दिव्यांग त्याच्या न्याय हक्कापासून वंचित राहतो. त्यामुळे हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक गुन्हा आहे. याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी डॉ. पुरी यांनी चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.