Pune : साखर भाव वाढले

पुणे : यंदा देशात उत्पादनात घट झाल्याने मार्केट यार्डातील घाऊक बाजारात साखरेच्या भावात क्विंटलमागे ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात देखील किलोच्या भावात ३ ते ४ रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली. सद्यःस्थितीत घाऊक बाजारातील साखरेचा प्रतिक्विंटल भाव ४००० ते ४१०० रुपये आहे, तर किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा भाव ४२ ते ४३ पर्यंत गेला आहे.
देशात महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये ऊस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे देशातील साखर उत्पादन ३२ दशलक्ष टनांवरून २७ दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. हे उत्पादन २९ दशलक्ष टनांच्या देशांतर्गत मागणीपेक्षा कमी आहे, तसेच जागतिक बाजारात साखरेची मागणी अधिक असल्याने किमती वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली असल्याची माहिती साखरेचे व्यापारी मुकेश गोयल यांनी सांगितले.
केंद्र सरकारने चालू महिन्यासाठी साडे बावीस लाख टनाचा कोटा खुला केला आहे. यंदा गाळप कमी झाल्याने काही दिवसांपासून साखरेची दरवाढ सुरू आहे. गेल्या आठवड्यात भावात क्विंटलमागे शंभर रुपयांनी वाढ झाली होती, तसेच शेतकऱ्यांना ३६०० रुपये एमएसपी मिळू शकतो, असाही अंदाज आहे. राज्यातील अनेक साखर कारखाने यंदा लवकर बंद होत आहेत. त्यामुळे ऊस गाळप कमी होत असल्याचे साखरेचे व्यापारी विष्णू गुप्ता यांनी सांगितले. यंदा साखरेचा महाराष्ट्रातील वाटा कमी झाला आहे. उसाला चांगला दर देऊन शेतकऱ्यांच्या हाती पैसे यावेत, या उद्देशाने सध्या एमएसपी वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भाववाढीची कारणे
– केंद्र सरकारकडून दहा लाख मेट्रिक टन निर्यातीला परवानगी
– महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये ऊस उत्पादन घटले
– आंतरराष्ट्रीय बाजारात मागणीत वाढ
– ब्राझील जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश असून, तेथे हवामानाच्या अस्थिरतेमुळे उत्पादन घटले
– साखरेच्या MSP (किमान आधारभूत किंमत) वाढीची शक्यता
– जगभरात ५४० ते ५५० डॉलर प्रतिटन किंमत आहे
यंदा देशात नेहमीच्या तुलनेत १५ टक्के उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. हवामानातील बदलामुळे घटलेले उत्पादन, इथेनॉल निर्मितीमुळे भाववाढ झाली आहे. आगामी काळात सण येणार आहेत. त्यामुळे साखरेचा तुटवडा निर्माण होऊन भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
– मुकेश गोयल, साखरेचे व्यापारी, मार्केट यार्ड.





