Pune : स्वारगेट भागातील कोंडी फोडण्यात यश : माधुरी मिसाळ

पुणे – अवघ्या काही वर्षांपूर्वी वाहनांची वाढती संख्या आणि नियोजनाच्या अभावामुळे स्वारगेट चौक आणि परिसर वाहतूक कोंडीचे आगार बनला होता. मात्र, आता या ठिकाणी एसटी, पीएमपी, रिक्षा आणि मेट्रोची सेवा त्याच्या सोबतच, व्यावसायिक अस्थापनां असलेले मेट्रोचे मल्टीमाॅडेल हब या भागासाठी गेमचेंजर ठरणार असून त्यासाठी आमदार म्हणून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचा विशेष आनंद असल्याच्या भावना पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केल्या.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ पर्वती दर्शन परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या भागातील नागरिकांनी या कामासाठी मिसाळ यांचे विशेष कौतूक करीत त्यांचे आभार मानले. तसेच, या प्रकल्पामुळे या भागात नोकरीच्या संधीही निर्माण होणार असल्याने युवकांकडून आभार मानण्यात आले.
मिसाळ म्हणाल्या की, या प्रकल्पामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे, उद्योग व्यवसाय बहरणार असून तरुणांना रोजगार मिळणार आहेत. भुयारी स्वारगेट मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. जमिनीखाली पाच आणि जमिनीवर पाच मजले आहेत. या ठिकाणी मॉल-मल्टिप्लेक्स आणि इतर व्यवसायांसाठी जागा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे खरेदी आणि खाण्यापिण्याची उत्तम सोय होणार आहे.
स्वारगेट कात्रज मार्गाचा पहिल्या टप्प्यात समावेश असणार आहे. तर मेट्रोच्या सेवेमुळे या भागातील व्यवसायांना चालना मिळणार असून स्थानिक नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. यावेळी माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते, रघुनाथ गौडा, अजय जगताप, राम गाडे, सुधीर कुरुमकर, श्रीकांत पुजारी, बाबुराव घाडगे, बसवराज गायकवाड, वसंत बनसोडे, अविनाश गायकवाड, सदाभाऊ शिंगे, सुशील परदेशी, संतोष सावंत,आशुतोष शेडगे, नितीन लगस, देवेंद्र बनसोडे, बंटी मोकळ, बाळासाहेब शेलार पदयात्रेत सहभागी झाले होते.





