Pune : अभ्यासगटाचा मुदतीच्या आधीच अहवाल

पुणे – सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास- समूह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचा अहवाल मुदतीच्या आधीच सादर केला आहे. अभ्यासगटाने शासनाला सादर केलेल्या सूचना गृहनिर्माण, सहकार, नगरविकास विभागाकडे पाठवून विभागांच्या सूचनांवर आधारित प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येईल.
अभ्यासगटाने स्वीकार केलेल्या निर्णयांबाबत शासन निर्णय लवकरच निर्गमित करून आगामी अधिवेशनात याबाबत झालेल्या कामाचा अहवाल सादर करण्यात येईल. यातील महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे राज्यातील प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामांना गती मिळून नागरिकांच्या स्वप्नातील सुंदर व मोठ्या घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानभवन येथे सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास- समूह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दरेकर, सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास – समूह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. सन २०१९ मध्ये स्वयंपुनर्विकास ही संकल्पना मांडली गेली. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पार पडलेल्या संमेलनात मी स्वत: सहभागी झालो होतो.
या संमेलनात जवळपास १९ मागण्या मांडल्या होत्या त्यातील १८ मागण्या पूर्ण करून गृहनिर्माण संस्थाच्या पुनर्विकासासाठी एक शासन निर्णय काढण्यात आला. यामध्ये अजून अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात आले. त्यामुळे २४ एप्रिल २०२५ ला आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट निर्माण केला. या अभ्यासगटाने सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास- समूह स्वयंपुनर्विकासासाठी अत्यंत अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण शिफारशी केल्या आहेत.





