Pune : “पंचतत्त्व” कला प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव
Pune :

Pune : गेल्या १६ वर्षांपासून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘एलिमेंट्स आर्ट क्लास’तर्फे यंदा “पंचतत्त्व” या वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २९ ते ३१ मे २०२६ या कालावधीत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे भरविण्यात येणार आहे.
एलिमेंट्स आर्ट क्लासच्या संचालिका प्रज्ञा कुलकर्णी गेली अनेक वर्षे लहान मुलांमधील सर्जनशीलता विकसित करण्यासाठी कार्यरत आहेत. यावर्षीच्या प्रदर्शनाची संकल्पना निसर्गातील पंचतत्त्वांवर वायू, जल, पृथ्वी, अग्नी आणि आकाश आधारित असून विद्यार्थ्यांनी विविध साहित्य, टेक्स्चर आणि आधुनिक कलात्मक तंत्रांचा वापर करून आकर्षक कलाकृती साकारल्या आहेत.
पाच वर्षांवरील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कलाकृतींमधून निसर्ग, मानवी भावना आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. रंगीबेरंगी चित्रे, मिक्स मीडिया आर्टवर्क आणि नाविन्यपूर्ण सादरीकरणांमुळे “पंचतत्त्व” हे प्रदर्शन नव्या पिढीच्या कलादृष्टीचे प्रतीक ठरणार आहे.
प्रदर्शन दरम्यान विद्यार्थ्यांच्या निवडक चित्रांची आणि कलाकृतींची विक्रीदेखील करण्यात येणार असून, कला रसिकांना उदयोन्मुख कलाकारांच्या कलाकृती खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हे प्रदर्शन दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत खुले राहणार असून, कला आणि सर्जनशीलतेचा अनोखा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





