पुणे: रूट मार्च काढणाऱ्या पोलीस पथकावर दगडफेक

पुणे – रूट मार्च करणाच्या पोलीस पथकासमोर रिक्षा आडवी लावत पुरुष व महिला पोलिसांना एका कुटुंबाने मारहाण केली. यात दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी अविनाश उत्तम कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोमनाथ चौधरी, राणी सोमनाथ चौधरी आणि सिताबाई दास चौधरी (सर्व रा. जनता वसाहत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी ९ वाजता पर्वती पोलीस आणि सीमा सुरक्षा बलाच्या एका गटाने पर्वती परिसरातून रुट मार्च काढला होता. ते जनता वसाहत गल्ली नंबर १०८ येथून परतत असताना, आरोपी सोमनाथला सरकारी गाडी जाण्यासाठी त्याची रिक्षा बाजूला घेण्यास सांगितली. मात्र, त्याने ती बाजूला न घेता रुट मार्च जाणाऱ्या मार्गावर आडवी लावली. यानंतर पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. पोलिसांनी त्याची समजूत काढली असता, त्याने पुन्हा शिवीगाळ करुन गर्दी जमा केली. यानंतर त्याने आईला आणि पत्नीला बोलावून घेतले.
हे तिघेही पोलिसांना शिवीगाळ करू लागले, पोलिसांनी रिक्षा बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगड मारण्यास सुरुवात केली. यामध्ये फिर्यादी आणि त्यांचा एक सहकारी पोलीस कर्मचारी जखमी झाला. यानंतर आरोपी सोमनाथ कपडे काढून रस्त्यावर लोळू लागला. यानंतर दोन्ही महिलांना महिला पोलीस बाजूला घेत असताना त्यांनी एका महिला पोलिसाच्या हाताचा चावा घेतला, तर एका महिला पोलिसाला झटापटीमध्ये हाताला आणि पोटाला मार लागला.





