Pune : मुद्रांक विभागाच्या अभय योजनेस मुदतवाढ

पुणे – नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या अभय योजनेस शासनाने मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुदतीत अर्ज करूनही त्रुटींची पूर्तता न केलेल्या अथवा दंडाची रक्कम न भरलेल्या नागरिकांना आता अभय योजनेचा लाभ मिळणार आहे.
विशेष बाब म्हणून शासनाने मुदतवाढ दिली असून, दि. 20 आॉगस्ट 2025 पर्यंत नागरिकांना कागदपत्रांची पूर्तता, दंडाची रक्कम भरणे शक्य होणार आहे. याचा फायदा राज्यातील 13 हजार 566 प्रकरणांना होणार आहे.
मुद्रांक शुल्क न भरलेल्या किंवा नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा सदनिकेची नोंदणी न केलेल्या रहिवाशांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने अभय योजना डिसेंबर 2023 रोजी लागू केली. ही योजना सप्टेंबर 2024 पर्यंत होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे योजनेस मुदतवाढ देण्याबाबत निर्णय होऊ शकला नाही.
अभय योजनेत राज्यभरातून 81 हजार 809 प्रकरणे नोंदणी विभागाकडे दाखल झाली. त्यापैकी मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम 41 हजार 85 प्रकरणांमध्ये वसुली झाली. त्यामध्ये एकूण 509 कोटी 61 लाख 88 हजार 264 रुपये इतकी रक्कम शासन दरबारी जमा झाली. उर्वरित 13 हजार 566 प्रकरणांमध्ये मुदतीत अर्ज केले; परंतु रक्कम भरल्यास एक महिन्याची मुदत दिल्यास शासनास महसूल जमा होऊन नागरिकांनाही दिलासा मिळेल.
तसेच अभय योजनेअंतर्गत प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होऊन दाव्यांच्या संख्येतही घट होईल, त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचा वेळ व खर्च वाचेल. यासर्व बाबी विचारात घेता, ज्या पक्षकारांनी अभय योजनेअंतर्गत विहित मुदतीत अर्ज दाखल केलेले आहेत. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे चलनाची रक्कम मुदतीत शासनजमा केलेली नाही, अशा पक्षकारांना मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 चा लाभ देण्यासाठी मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतला असून, त्याचा आदेश महसूल व वन विभागाचे सत्यनारायण बजाज यांनी जारी केला आहे.
यांना होणार फायदा
नोंदणी विभागाच्या कार्यालयाकडे अभय योजनेसाठी मुदतीत अर्ज केला आहे. मात्र, त्रुटींची पूर्तता केली नाही, मुद्रांक शुल्क व दंड भरण्याची नोटीस मिळालेली नाही, दंड भरण्याची नोटीस मिळाली; परंतु तो दंड भरला नाही, अशा प्रकरणांना या मुदतवाढीचा लाभ घेता येणार आहे.





