Children’s Theatre : कलाकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; बालनाट्यगृहासाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा
Children's Theatre : २९ ऑगस्ट रोजी यशवंत चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे नियोजित बेमुदत उपोषण सुरू केले जाणार होते.

पुणे : पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असलेले स्व. बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह तब्बल ११ वर्षांपासून रखडले आहे. उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कलाकार, रंगकर्मी आणि नाट्यरसिकांचा संयम आता संपला असून, प्रश्न सोडविण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांनाच रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे.
तसेच, परवानगी न मिळाल्याने आंदोलन पुढे ढकलण्यात आले असले तरी हा लढा कायम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या नाटयगृहाचे काम २०१४ पासून रखडलेले असून त्याचा खर्च २ कोटींवरून २९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतरही या कामांसाठी आणखी निविदा काढण्यात येत आहे.
त्यामुळे, हा गैरप्रकार थांबवून नाटयगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी यशवंत चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे नियोजित बेमुदत उपोषण सुरू केले जाणार होते. मात्र, राजकीय दबावातून पोलिसांमार्फत समज देऊन थांबविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विभागाने केला आहे.
मात्र, उत्सवाचा कालावधी आणि कायदा सुव्यवस्था लक्षात घेवून आंदोलन रद्द करण्यात आले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
प्रकल्पाच्या खर्चाची श्वेतपत्रिका आणि विलंबाला जबाबदारांवर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. प्रशासनाने तातडीने खुलासा करावा अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
हेही वाचा:





