Pune Solapur Highway: पुण्याचं महाद्वारच अंधारात! अपघातांची मालिका अन् डिझेल चोरांची चांदी; कधी लागणार दिवे?
Pune Solapur Highway: पुणे-सोलापूर महामार्गावर पूर्व हवेली परिसरात पथदिवे बंद; निगा व दुरुस्तीअभावी रात्रीच्या वेळी वाहनचालक व पादचाऱ्यांची मोठी कसरत.

Pune Solapur Highway – पुणे शहराचे पूर्वकडील महाद्वार असलेल्या महाद्वाराराचा मार्गच अंधारातून येत आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पथदिव्यांचे खांब उभारण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने खांब असूनही महामार्गाचा परिसर रात्रीच्या वेळी अंधारात बुडत आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पूर्व हवेलीतील हडपसर, शेवाळेवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीतील विविध भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. दिवसभर वाहनांची वर्दळ असलेल्या मार्गावर रात्रीच्या वेळीही अवजड वाहने, दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी ये-जा सुरू असते. मात्र, अनेक ठिकाणी पथदिवे बंद असल्याने वाहनचालकांना अंधारातच मार्ग काढावा लागत आहे.
पथदिव्यांचे खांब उभारलेले असताना त्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती का केली जात नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी दिवे नादुरुस्त, तर काही ठिकाणी विद्युत पुरवठ्याच्या समस्येमुळे प्रकाश व्यवस्था बंद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महामार्गावर अंधार असल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे.
विशेषतः रस्ता ओलांडणारे पादचारी, दुचाकीस्वार आणि स्थानिक नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेऊन गाडयांच्या टाकीतील डिझेल चोरीचे प्रमाण वाढले आहे. महामार्गाशेजारील दुकानांचे शटर उचकटून अनेक दुकानातील वस्तू व रोकड चोरीचे प्रमाणही वाढले आहेत. शेवाळेवाडीपासून महामार्गावर खड्डेच खड्डे पडल्याने अंधारात हे खड्डे वाहनचालकांना दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत.
“रात्रीच्या वेळी महामार्गावरील सुरक्षितता लक्षात घेता संपूर्ण पूर्व हवेलीतील पथदिव्यांची पाहणी करून नादुरुस्त दिवे, विद्युत जोडणी आणि इतर तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन होणारे अवैध धंदे बंद होतील.”
– आण्णा चौधरी, सोरतापवाडी, सामाजिक कार्यकर्ते.





