Plane Crash : कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात; दोन वैमानिकांचा जागीच मृत्यू
Plane Crash : कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळून गुजरातचे प्रशिक्षक पायलट सचिन भाटिया आणि कर्नाटकचे प्रशिक्षणार्थी अभिषेक पुजारी यांचा मृत्यू झाला.

Plane Crash : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुरुवारी सकाळी प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे खासगी विमान कोसळून दोन पायलटांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गुजरातचे प्रशिक्षक पायलट सचिन भाटिया आणि कर्नाटकातील प्रशिक्षणार्थी पायलट अभिषेक पुजारी यांचा समावेश आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना गंगा बॅरेजजवळील नत्थूपुर्वा गावातील कटरी परिसरात घडली. विमानाने सकाळी सुमारे ११.३० वाजता प्रशिक्षण केंद्रातून उड्डाण केले होते. सुमारे २० मिनिटांनी परतीच्या मार्गावर असताना ते शेतात कोसळले.
हे ट्विन-इंजिन टेक्नम (Tecnam) विमान असून, गार्ग एव्हिएशनच्या फ्लाइंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी वापरले जात होते. हे विमान २०२३ मध्ये प्रशिक्षण केंद्रात आणण्यात आले होते. प्रशिक्षक सचिन भाटिया यांना सुमारे ३ हजार तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता.
विमान शेतात कोसळल्यानंतर त्याचे अवशेष परिसरात विखुरले. दुर्घटनेनंतर मोठा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या दुर्घटनेची तांत्रिक चौकशी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) माहिती देण्यात आली असून, DGCAकडून विमान दुर्घटनेच्या कारणांचा तपास केला जाणार आहे.
कासगंजमध्येही प्रशिक्षण विमानाला अपघात –
याच वर्षी जूनमध्ये उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात प्रशिक्षण विमान शेतात कोसळले होते. या दुर्घटनेत महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी महिला पायलट कैनात खान किरकोळ जखमी झाल्या होत्या. अलिगढ विमानतळावरून प्रशिक्षणासाठी उड्डाण केलेले हे दोन आसनी विमान कासगंजच्या पोलीस लाईन्सजवळील परिसरात कोसळले होते.
खाली येताना विमान उच्चदाबाच्या वीजवाहिनीला धडकले होते. प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. कैनात खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांची प्रकृती स्थिर होती. त्या विमानातील एकमेव व्यक्ती होत्या.
बारामतीतही प्रशिक्षण विमानाची हार्ड लँडिंग –
मे महिन्यात महाराष्ट्रातील बारामतीजवळील गोजुबावी गावाजवळ रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीच्या प्रशिक्षण विमानाची हार्ड लँडिंग झाली होती. १३ मे रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान प्रशिक्षणार्थी पायलट नियमित सराव करत होता. उतरताना विमान खांबाला धडकले. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांनी ही दुर्घटना नसून हार्ड लँडिंग असल्याचे सांगितले होते. विमानातील पायलट एकटाच होता आणि तो सुरक्षित होता.





