पुणे : …तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ; कॉंग्रेस-राष्ट्रवादीला भाजप शहराध्यक्षांचा इशारा

पुणे –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याला विरोध करीत कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीने शहरात दि. 6 मार्चला निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यात या पक्षांनी निदर्शने केल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला आहे. त्यामुळे, पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
मुळीक म्हणाले की, भाजपने पुण्यासाठी काय केले? हा प्रश्न विचारण्याचे धाडस कॉंग्रेसचे नेते करतात, याचे आश्चर्य वाटते. खरे तर कॉंग्रेसने 50 वर्षांत काय केले? हा खरा प्रश्न आहे. पुणे मेट्रो कॉंग्रेसच्या काळात कागदावरच राहिली. राज्यात आणि केंद्रात भाजपचे शासन आल्यानंतर मेट्रोला गती मिळाली आणि केवळ पाच वर्षांत पुण्यात मेट्रो धावू लागली. भाजपचे पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही नक्की सत्तेत येऊ, असा विश्वास वाटतो. मोदी यांचा दौरा पूर्णपणे शासकीय आहे. त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने करू नये, अन्यथा भाजपकडूनही त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असे मुळीक यांनी म्हटले आहे.
प्रशांत जगतापांना किंमत देत नाही…
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या घोषणांना किंमत देत नसून, त्यांना गांभीर्याने घेत नाही. त्यांची बाहेर एक आणि महापालिकेत दुसरे अशी भूमिका असते. त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक त्यांचेच आदेश पाळत नाहीत. हे वारंवार सिद्ध झाले आहे. शहरातील सिग्नल यंत्रणांचे सुसूत्रीकरण, महापालिकेचे करोना काळातील कॉफी टेबल बुक, शहरात उभी राहत असणारी रुग्णालये या बाबतीत त्यांनी आंदोलने केली. परंतु, त्यांच्या महापालिकेतील सर्वच सभासदांनी या ठरावांना एकमुखी पाठींबा देत जगताप यांना तोंडघशी पाडले. त्यामुळे त्यांना आम्ही किंमत देत नसल्याची टिका मुळीक यांनी केली आहे.





