PUNE : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती चरणी मानाच्या अश्वांची मानवंदना
PUNE :

PUNE : आषाढी वारीला पंढरपूरला प्रस्थान करण्यापूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात येऊन श्री गणरायाच्या चरणी मानवंदना अर्पण केली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे मानाच्या अश्वांचे विधिवत पूजन करण्यात आले.
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या मालकीचे हे मानाचे अश्व पुण्यात दाखल झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, श्रीमंत महादजी राजे शितोळे सरकार आदी उपस्थित होते.
दरवर्षी आषाढी वारीपूर्वी श्री गणरायाचे दर्शन घेऊनच हे अश्व आळंदीकडे प्रस्थान करतात. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या चरणी वंदन करून वारीची सुरुवात करण्याची ही अनोखी परंपरा आमच्यासाठी अत्यंत आनंददायी आहे, असे श्रीमंत उर्जितसिंह शितोळे यावेळी म्हणाले.
आषाढी वारी ही केवळ परंपरा नसून, महाराष्ट्राच्या भक्ती, समर्पण आणि सेवाभावाचे प्रतीक आहे. प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नसले तरी वारकऱ्यांच्या सेवेत योगदान देण्याची संधी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला लाभते, हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
आरोग्य सेवा, भोजन सेवा, चरण सेवा, औषध वितरण यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेचा आमचा प्रयत्न असतो. मानाच्या अश्वांचे मंदिरात आगमन हे या सेवाकार्याची शुभ सुरुवात ठरते, असे जावळे म्हणाले.




