पुणे : नदीपात्रात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना घडली. खूनामागचे कारण समजू शकले नाही. कुशल कसबे ( ३३, रा. महात्मा फुले पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई आकाश सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशल तीन वर्षांपूर्वी कात्रज येथील पीएमपी आगारात कंत्राटी पद्धतीवर सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तेथील काम त्याने सोडले होते. बेरोजगार असलेल्या कुशलला दारू पिण्याचे व्ससन होते. नदीपात्रातील खाद्यपदार्थांच्या स्टाॅलजवळ एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती रविवारी सकाळी डेक्कन पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सुरुवातीला मृतावस्थेत पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नव्हती. पोलिासंनी ओळख पटविली. कुशल याच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले असून, पसार झालेल्या आरोपी्ंचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करत आहेत.