PUNE: फेलोशिप परीक्षेचा सावळा गोंधळ

पुणे – बार्टी, सारथी आणि महाज्योती यांच्यावतीने संशोधक अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशिप) यापूर्वी झालेली संयुक्त प्रवेशपूर्व परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा दि. १० जानेवारीला पुन्हा घेण्याचा निर्णय झाला. मात्र, ही परीक्षादेखील रद्द करण्यात आल्याचे बार्टीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे संशोधक अधिछात्रवृत्तीच्या प्रतीक्षेतील हजारो विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे ही परीक्षा घेण्यात येते. पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व नागपूर या विभागांतर्गत २४ डिसेंबरला परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
परंतु या परीक्षेत सेट २०१९ची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी आल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली. त्यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवारी विद्यापीठ प्रशासन, बार्टी, सारथी आणि महाज्योती यांच्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत १० जानेवारीची तारीख जाहीर करण्यात आली.
एकीकडे पुणे विद्यापीठाने परिपत्रक काढत ही परीक्षा १० जानेवारी रोजी होणार असल्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे ‘बार्टी’ने ही परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली. परंतु दरम्यान, सारथी आणि महाज्योती या संस्थांनी या परीक्षेबाबत कोणताही स्वतंत्र निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमवस्था निर्माण झाली आहे.





