pune: गरजूंसाठी धान्याच्या भिंती उभारण्याचा आदर्श
pune:

सेवा मित्र मंडळाकडून निराधार कुटुंबांना एक लाख रुपयांचे किराणा साहित्य
pune: सध्या विसर्जन मिरवणुकीतील स्पीकर, ध्वनिप्रदूषण आदींची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असताना, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाने उत्सवाला सामाजिक बांधिलकीची दिशा देत गरजू आणि निराधार कुटुंबांसाठी धान्याच्या भिंती उभारण्याचा आदर्श निर्माण केला आहे.
उत्सवातील शक्ती समाजाच्या उपयोगी यावी, या भावनेतून मंडळातर्फे एक लाख रुपयांच्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये मुस्लिम कुटुंबांसह रोजगारासाठी पुण्यात आलेल्या नेपाळी कुटुंबांचाही समावेश आहे.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी आमदार हेमंत रासने, नगरसेवक राघवेंद्र मानकर, सौरभ वीरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, गणेश अवघडे, आनंद सराफ, उमेश कांबळे, अशोक मेहेंदळे, शिरीष शिंदे, किरण सोनीवाल, अमित जाधव, अनिकेत मारणे, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष राजा महाडिक, शिरीष मोहिते, अमर लांडे, नमन कांबळे, विक्रांत मोहिते उपस्थित होते.
सेवा मित्र मंडळाने स्पीकरच्या भिंतींऐवजी गरजू कुटुंबांसाठी धान्याच्या भिंती उभारून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली आहे. १३४ वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवाने अनेक समर्पित कार्यकर्ते घडवले आहेत.
एक दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीमुळे वर्षभर हा उत्सव समाजाला कशा प्रकारे मदत करतो, हे विसरता कामा नये. गणेशोत्सव ही एक चळवळ असून, या चळवळीने संघटित शक्ती निर्माण केली आहे, असे रासने म्हणाले.
समाजातील गरजू कुटुंबांनाही सण आनंदाने साजरा करता यावा, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. गणेशोत्सव हा कोण्या एका धर्माचा उत्सव नसून, त्यात मुस्लिम समाजासह विविध समाजघटकांचेही योगदान राहिले आहे. त्यामुळे हा उत्सव समाजाला जोडणारा आणि एकमेकांना आधार देणारा ठरला पाहिजे, असे मोहिते म्हणाले.





