pune : आयुक्तांची खुर्ची वाचविण्यासाठी पालिकेत धावपळ
Pune:

आयुक्तांची खुर्ची वाचविण्यासाठी पालिकेत धावपळ
pune : फुरसुंगी येथील कचरा डेपोबाधित शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी थेट आयुक्त दालनातच खुर्ची, संगणक आणि साहित्य जप्तीचे वॉरंट घेऊन कोर्टाचे अधिकारी , शेतकरी आणि वकील महापालिकेत आले होते. या प्रकरणी आठ दिवसांच्या आत पैसे भरण्याचे न्यायालयाला बॉन्डवर लिहून दिल्याने ही कारवाई थांबली.
मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. या प्रकरणी सर्व संबधितांची चौकशी करून तातडीनं जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांना दिले आहेत.
तसेच या प्रकरणी दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ नोटीसा बजावण्यात येणार असून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईही केली जाणार आहे. या प्रकारानंतर आयुक्तांची खुर्ची वाचविण्यासाठी दिवसभर महापालिकेचा विधी विभाग तसेच भूसंपादन विभागाची धावपळ सुरू होती.
महापालिकेने बाधित शेतकऱ्यांना दिलेल्या तुटपुंज्या मोबदल्याच्या विरोधात शेतकरी २००५ मध्ये न्यायालयात गेले होते. त्याची वेगवेगळया न्यायालयात सुनावनी झाल्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या या मुदतीनंतरही महापालिकेने शेतकऱ्यांना रक्कम न दिल्याने न्यायालयाने आयुक्तांची खुर्ची तसेच लॅपटाॅप जप्त करण्याचे आदेश दिले होते.





