Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्ग की मृत्यूचा सापळा? खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला; प्रशासनाचे दुर्लक्ष
Pune Satara Highway: टोल भरूनही सुरक्षित प्रवास केवळ कागदावरच! महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप.

Pune Satara Highway – सातारा-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यामुळे महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यामुळे ‘सुरक्षित प्रवास’ हा कागदावरच दिसत आहे. या मार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असताना रस्त्याची अशी अवस्था झाल्याने वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या अधिक गंभीर झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना रस्त्याची प्रत्यक्ष स्थिती समजत नाही. अचानक वाहन खड्ड्यात गेल्याने वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण होते. दुचाकीस्वारांसाठी तर ही परिस्थिती अधिक धोकादायक झाली आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालक अचानक लेन बदलत असल्याने इतर वाहनांनाही धोका निर्माण होत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात परिस्थिती अत्यंत धोकादायक बनते. त्यामुळे ‘महामार्ग’ की ‘मृत्यूचा सापळा?’ असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्गाची नियमित देखभाल, खड्ड्यांची दुरुस्ती आणि अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी खड्डे कायम आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासन नेमके कोणत्या कामात व्यस्त आहे.
असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे असतानाही अनेक ठिकाणी परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल आता प्रवासी आणि वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
महामार्गावरील खड्ड्यांचा परिणाम केवळ अपघातांपुरता मर्यादित नसून वाहनांच्या देखभालीच्या खर्चातही वाढ होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना आर्थिक फटका बसत आहे. खड्डे चुकविण्यासाठी वाहनांचा वेग कमी-जास्त होत असल्याने वाहतुकीच्या सुरळीत प्रवाहावरही परिणाम होत आहे.
‘टोल’ घेता, मग रस्तेही सुरक्षित द्या!
महामार्गावरून प्रवास करणार्या वाहन चालकांकडून विविध शुल्क आकारले जाते. त्यामुळे त्या बदल्यात सुरक्षित, सुस्थितीत आणि प्रवाशांसाठी योग्य असा महामार्ग उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. ‘टोल वसुलीत तत्परता, मग रस्त्यांच्या दुरुस्तीत दिरंगाई का?’ असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.
तातडीने उपाययोजना करणे गरजेचे
सातारा-पुणे महामार्गाची तातडीने पाहणी करून सर्व खड्डे बुजविण्यात यावेत. खचलेले रस्ते दुरुस्त करावेत, पावसाचे पाणी साचणार्या ठिकाणी योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी तसेच धोकादायक ठिकाणी आवश्यक सूचना फलक आणि सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.






