Pune : समान पाणी पुणेकरांपासून अद्यापही दूरच; सात वर्षात १३०० कोटींचा खर्च

पुणे : एकीकडे महापालिकेने जादा पाणी वापरले म्हणून पाटबंधारे विभाग महापालिकेस कोटयवधीचा दंड आकारत आहे. तर, दुसरीकडे पाण्याची गळती रोखून पुणेकरांना समान पाणी योजनेचे पाणी देण्यासाठी पालिकेकडून राबविल्या जाणाऱ्या योजनेचे काम कासवतीने सुरू आहे. २०१८ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत या योजनेवर १३३४ कोटींचा निधी खर्चीही पडला आहे. महापालिकेने वेळेत काम पूर्ण केल्यास पाटबंधरे विभागाचा दंड भरावा लागणार नाही. त्यामुळे पालिकेने ही कामे वेळेत पूर्ण करावीत अशी मागणी केली जात आहे.
शहरातील ४० टक्के पाण्याची गळती रोखणे तसेच पुणेकरांना २४ तास पाणी देण्याचे गाजर दखवीत महापालिकेकडून तब्बल २४११ कोटी रुपयांच्या समान पाणी योजनेचे काम सुरू करण्यात आले. महापालिकेकडून शहराचे पाच झोन करून त्यानुसार हे काम करण्यात येत आहे. या योजने अंतर्गत शहरात ८२ पाण्याच्या टाक्या बांधणे, गळती रोखण्यासाठी १४०० किलोमीटरच्या जलवाहिन्या उभारणे आणि शहरात २ लाख ८० हजार पाण्याचे मीटर बसविणे अशा कामांचा समावेश होता. मात्र, या तीन्ही मधील एकही काम अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी, ज्या उद्देशाने ही योजना प्रस्तावित करण्यात आली, तो उद्देशच हरवल्याचे दिसत आहे.
टाक्यांचे काम रखडले
समान पाणी योजनेसाठी अमृत योजनेतून अडीचशे कोटी रुपये मिळवून फेब्रुवारी २०१८ मध्ये टाक्या बांधायला सुरुवात करण्यात आली. आज ७ वर्षे झाल्यानंतर आणि सहा वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही एकूण ८६ टाक्यांपैकी आज रोजी केवळ ६६ टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. १३ टाक्यांची कामे सुरू असून पाच टाक्यांच्या जागा बदलण्यात आल्या आहेत; तर २ टाक्यांसाठी जागाच नाही. त्यामुळे टाक्यांचे काम पूर्ण होण्यास मार्च २०२६ उजाडेल अशी स्थिती आहे.
मिटर, जलवाहिन्यांची कामेही रखडली
शहरातील पेठांमधील काम दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ ६७ टक्के मीटर बसले असून, जलवाहिनीचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. लोहगाव, धानोरी, कळस या भागातील कामाची सद्यस्थिती बघता मीटर बसविणे आणि जलवाहिनीचे ९३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
वारजे भागात ८२ टक्के मीटर्स बसले असून, जलवाहिनीचे काम ९७ टक्के पूर्ण झाले आहे. या कामाला नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. कॅन्टोन्मेंट भागात फक्त ५१ टक्के मीटर बसले असून, जलवाहिनीचे काम फक्त ११ टक्केच पूर्ण झाले आहे. वडगाव भागात ८७ टक्के मीटर बसले असून, ९७ टक्के जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे.
पुण्यात पाणीगळती ४० टक्के आहे आणि ती कमी करण्यासाठी ही समान पाणीपुरवठा योजना आणण्यात आली आहे. एकीकडे जलसंपदा खातं पुण्यातील जादा पाणी वापरावर दंडात्मक बिलाची आकारणी करतंय आणि याला उत्तर म्हणून ज्या समान पाणीपुरवठा योजनेकडे बोट दाखवलं जातं आहे ती मात्र वर्षानुवर्षे रेंगाळतीये हे अत्यंत खेदजनक आहे
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे




