Pune : समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत

पुणे : समर्थ रामदास यांनी देशभर स्थापन केलेले मठ तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडले जावेत. तसेच त्यांचे साहित्य हिंदी, इंग्रजी भाषेतही उपलब्ध करावेत, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. समर्थसृष्टीच्या निर्मितीचा प्रस्ताव दिल्यास त्यावर सहकार्य करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले.
समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या तर्फे ब्रह्मीभूत भागवताचार्य पू. डोंगरे महाराज यांच्या मूळ गुजरातीतील श्रीराम कथा या ग्रंथाच्या मराठी भावानुवादाचे प्रकाशन झाले. वारकरी संप्रदायाचे भक्त शिरोमणी ह.भ.प. श्री चैतन्यमहाराज देगलूरकर, समर्थ सेवा मंडळ सज्जनगडचे कार्याध्यक्ष अच्युत गोडबोले, कार्यवाह योगेश्वरबुवा रामदासी, सुहास क्षीरसागर, अक्षय महाराज भोसले यावेळी उपस्थित होते.
शिवसृष्टीच्या धर्तीवर समर्थसृष्टी निर्माण करण्याची मागणी क्षीरसागर यांनी केली. सध्या महायुतीकडून नाशिक कुंभमेळ्याची व्यवस्था केली जात आहे.समर्थसृष्टीने समाज जोडता यावा, हे त्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या देवस्थांनाना मदत केली जात आहे. तेव्हा समर्थसृष्टीच्या निर्मितीसाठीही मदत केली जाईल असे आश्वासनही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.
सर्किट निर्मितीसाठी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई मदत करतील. तसेच दासबोधाच्या प्रचार आणि प्रसारासाठी सरकार पूर्ण सहकार्य करेल, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.





