Pune : महापालिकेच्या ४५ कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविले

पुणे – महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील मिळकतींची करआकारणी करण्यामध्ये दिरंगाई करणाऱ्या मिळकतकर विभागाच्या ४५ कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात आले आहे, तसेच कामात हलगर्जीपणा केला असल्यामुळे तुमच्यावर कारवाई का करू नये, याबाबतचा खुलासाही या कर्मचाऱ्यांकडून मागविण्यात आला आहे. करसंकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी ही माहिती दिली.
या कर्मचाऱ्यांवर वाघोली, नऱ्हे आणि मांजरी या समाविष्ट गावांतील मिळकतकराची करआकारणी करण्याची जबाबदारी होती. त्यानंतरही त्यांच्याकडून सुमारे १८ हजार मिळकतींना कर आकारण्यात आलेला नाही, तसेच या कर्मचाऱ्यांना करआकारणी संथगतीने केली जात असल्याची नोटीसही बजाविण्यात आली होती. त्यानंतरही त्यांच्याकडून हे काम करण्यात न आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
१८ हजार मिळकतींची नोंदणीच नाही
महापालिकेत २०१७ पासून नवीन ३४ गावांचा समावेश झाला आहे. या गावांना महापालिकेकडून शासनाच्या नियमानुसार करआकारणी केली जात आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे असलेल्या नोंदीही महापालिकेने ताब्यात घेतल्या असून, त्यानुसार पूर्वी आकारणी झालेल्या मिळकतींना नवीन दराने, तसेच आकारणी न झालेल्या मिळकतींना नव्याने आकारणी केली जात आहे.
मात्र, वाघोली, नऱ्हे आणि मांजरी या समाविष्ट गावांतील मिळकतींची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही रेकाॅर्डवर असलेल्या जवळ्पास १८ हजार मिळकतींची नोंदणीच झालेली नाही. परिणामी, महापालिकेच्या करवसुलीवर त्याचा परिणाम होत आहे. त्याचबरोबर करआकारणी न झाल्याने नागरिकही पैसेही भरत नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर केलेल्या तपासणीत करआकारणीलाच दिरंगाई केली जात असल्याचे समोर आले असल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे.
कर निरीक्षकांच्या होणार बदल्या
मिळकतकर विभागात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या विभागीय निरीक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यापूर्वी या विभागात काम न केलेल्या निरीक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. अनेक कर निरीक्षकांच्या वर्षानुवर्षे बदल्या न झाल्याने, तसेच काही ठराविक भागातच बदल्या करून घेण्यावर भर दिला जात असल्याचे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.





