Pimpri : कर संकलन विभागाची ९४८ कोटी वसुली

पिंपरी : महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने शहरातील मालमत्ताधारकांकडून कर वसूल केला जातो. यंद्याच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षांमध्ये विभागाने ९४८ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. ही आकडेवारी सोमवार (दि. ३१) सायंकाळी सातपर्यंतची असून त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी वसुलीचे उदिष्ट दिलेले आहे. विभागाकडून मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ९४८ कोटी ७१ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. गतवर्षी ९७७ कोटी २५ लाख रुपयांची वसुली करण्यात आली होती. सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत नागरिकांना कर भरण्याची मुदत देण्यात आली होती.
त्यामुळे यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विभागाने कटू कारवाई कऱण्यास सुरूवात केली होती. ज्या नागरिकांनी कर थकवला आहे त्यांचे पाणी बंद करण्यात आले होते. तसेच मालमत्ता जप्त करत त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया प्रस्तावित करण्यात आली आहे.
विभागाने थकबाकीदार कंपन्या, कारखाने, शॉपींग मॉल, पेट्रोल पंप, रूग्णालय, शाळा, महाविद्यालय, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल तसेच, निवासी मालमत्ता सील केल्या आहेत. कारवाईनंतर थकबाकीदार बिल भरत होते. त्यामुळे शेवटच्या महिन्यात १६४ कोटी रुपयांपर्यंत विभागाने मजल मारली.
सायंकाळी सात वाजेपर्यंत ९४८ कोटी ७१ लाख रुपयांचा कर जमा झाला आहे. मार्च महिन्यामध्ये १६४ कोटी रुपये जमा झाले आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत मुदत असल्याने यामध्ये आणखी वाढ होईल.
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिं. चिं. महापालिका





