Pune Gramin : गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणारी टोळी मंचर पोलिसांच्या जाळ्यात; सुमारे 7 लाखांचा मुद्देमाल जप्त!
राजगुरुनगर आणि मंचर बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या (Pune Gramin) अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीला मंचर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने जेरबंद केले.

Pune Gramin : राजगुरुनगर आणि मंचर बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या (Pune Gramin) अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीला मंचर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने जेरबंद केले. आरोपींकडून सुमारे ६ लाख ९२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सोन्याच्या बांगड्या व चोरीसाठी वापरण्यात आलेली एर्टीगा कार यांचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मंचर येथील एसटी बसस्थानकात नाशिक-पुणे बसमध्ये चढत असताना सौ. शकुंतला मनोहर थिटे (वय ६१, रा. मुळेवाडी रोड, मंचर) यांच्या हातातील सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत लंपास केली होती. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार शेखर भोईर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे, अजित पवार व हनुमंत ढोबळे यांचे पथक आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, १३ जून २०२६ रोजी रात्री एकच्या (Pune Gramin) सुमारास मंचर पोलीस ठाण्याचे तपास पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी एकलहरे (ता.आंबेगाव) परिसरात गस्त घालत असताना एचपी पेट्रोलपंपाजवळ बंद पडलेल्या मंगल कार्यालयाशेजारी संशयास्पदरीत्या उभी असलेली एमएच-४६-डब्ल्यू-३१८४ क्रमांकाची एर्टीगा कार आढळून आली.
कारमधील चार जणांकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.सखोल चौकशीत आरोपींनी आपली नावे अमोल सुरेश टिडंगे (४०), कपिल सुरेश टिडंगे (३८), दीपक वतन अभंगे (४८) आणि राजेश दीपक गारुंगे (५८), सर्व रा. सुभाषवाडी, वांद्रापाडा, अंबरनाथ, जि. ठाणे अशी असल्याचे सांगितले.
तपासादरम्यान आरोपींनी मंचर पोलीस ठाण्यातील दोन तसेच खेड पोलीस ठाण्यातील एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात यापूर्वी कल्याण परिसरात चोरीचे सुमारे १५ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीसांनी आरोपींकडून १ लाख ९२ हजार ७४० रुपये किंमतीच्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या तसेच ५ लाख रुपये किंमतीची एर्टीगा कार असा एकूण ६ लाख ९२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक यादव, पोलीस हवालदार शेखर भोईर, संजय नाडेकर, सुदाम घोडे, नंदकुमार आढारी, योगेश रोडे, अजित पवार, हनुमंत ढोबळे, सुनील काठे, अविनाश दळवी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अतुल डेरे, संदीप फड, स्वप्निल गाढवे आणि निलेश सुपेकर यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हवालदार शेखर भोईर करीत आहेत.






