Pune RTO : पुणे आरटीओचा खोळंबा! दोन आठवड्यांपासून वाहनांची फिटनेस चाचणी बंद; वाहन चालकांचा संताप
Pune RTO : स्वयंचलित चाचणी केंद्राचे (ATS) काम अपूर्ण; तांत्रिक कारणास्तव २ मार्चपासून फिटनेस प्रक्रिया ठप्प झाल्याने हजारो वाहने रस्त्यावर येण्यास मुकली.

Pune RTO – मागील दोन आठवड्यापासून पुण्यातील वाहनांची फिटनेस चाचणी बंद आहे. परिणामी व्यावसायिक वाहनांचे फिटनेस आणि पासिंग रखडले असून, त्याचा फटका वाहनचालक आणि मालकांना बसत असून, राज्य सरकारने तात्काळ ही चाचणी सुरू करावी, अशी मागणी वाहतूक संघटनांकडून केली जात आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने व्यावसायिक वाहनांसाठी स्वयंचलित चाचणी केंद्रात (एटीएस) फिटनेस तपासणी अनिवार्य केली आहे. मात्र, राज्यात विविध ठिकाणी एटीएस केंद्रांची उभारणी सुरू असून, त्यामध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचाही समावेश आहे. परिणामी केंद्र सुरू नसल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात वाहनांची फिटनेस चाचणी बंद झाली.
या वेळी वाहनचालक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर दहा दिवस मोटार वाहन निरीक्षकांमार्फत पूर्वीप्रमाणे फिटनेस तपासणीला सुरवात झाली. मात्र, दि. २ मार्चपासून आदेश न आल्यामुळे मागील दोन आठवड्यांहून अधिक दिवसांपासून ही प्रक्रिया पुन्हा बंद केली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे अंतर्गत दिवे परिसरात स्वयंचलित चाचणी केंद्र उभारले जात आहे.
परंतु हे केंद्र पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी किमान दीड ते दोन महिने लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या कालावधीत खासगी व्यावसायिक वाहने, मालवाहतूक वाहने, रिक्षा तसेच एसटी महामंडळ आणि पीएमपीच्या काही वाहनांचेही फिटनेस प्रलंबित राहिले आहे.
“पुण्यात स्वयंचलित चाचणी केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे ते सुरू होईपर्यंत पूर्वीप्रमाणे मोटार वाहन निरीक्षकांमार्फत फिटनेस चाचणी घ्यावी; अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”
– बापू भावे, सचिव, रिक्षा फेडरेशन
“पूर्वीप्रमाणे मोटार वाहन निरीक्षकांमार्फत फिटनेस चाचणी सुरू व्हावी, याबाबत परिवहन कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पुढील आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.”
– स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे





