Pune: बाल संगोपन योजनेला २१ कोटी रुपयांचा निधी

पुणे – सन २०२४- २५ या चालू आर्थिक वर्षासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी २१ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास महिला व बाल विकास विभागाने मान्यता दिली आहे.
अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या शून्य ते १८ वयोगटांतील मुला- मुलीना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटूंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे, या मुख्य उद्देशाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राज्यात सन १९७५ मध्ये सुरू करण्यात आली आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचनाही तयार करण्यात आल्या. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या सूचनेनुसार सदर योजनेचा लाभ डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात व संस्थेच्या खात्यात वितरीत करण्यात येतो.
अर्थसंकल्पित केलेला निधी महिला व बाल विकास आयुक्त यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तरतुदींचे पालन करण्याबाबत दक्षता घ्यावी. बाल संगोपन योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी शासन निर्णयाच्या दिनांकापासून सात दिवसांत वितरीत करून त्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे, असे आदेशही शासनाकडून बजावण्यात आले आहेत.





