Pune Ring Road : पुणे रिंगरोडला ‘स्व. अजितदादा पवार’ यांचे नाव द्यावे; आमदार शंकर मांडेकर यांची मागणी
Pune Ring Road : पुणे रिंगरोड प्रकल्पाला 'स्व. नामदार अजितदादा पवार' यांचे नाव देण्याची मागणी; आमदार शंकर मांडेकरांनी मांडला ठराव.

Pune Ring Road – पुणे जिल्ह्यातील रिंगरोड प्रकल्पाला ‘स्व. नामदार अजितदादा पवार रिंग रोड’ असे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.आमदार मांडेकर म्हणाले की, पुणे जिल्ह्यात स्व. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगरोडसह अनेक विकासकामे प्रगतीपथावर होती. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
विकासाला चालना देणार्या या महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाला त्यांचे नाव देण्याबाबत जिल्हा नियोजन समितीत ठराव मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.बैठकीत आमदार मांडेकर यांनी मतदारसंघातील राजगड तोरणा किल्ला आणि रायरेश्वर किल्ला हे राज्य संरक्षित किल्ले असून, तेथील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आणून दिले. विशेषतः रायरेश्वर किल्ल्यावर चढण्यासाठी रस्ता व पायर्या सुव्यवस्थित करण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच जिल्हा नियोजन समितीमार्फत महावितरणला रोहित्र बसवण्यासाठी निधी दिला जात असला, तरी कामे वेळेत पूर्ण होत नसल्याची तक्रार त्यांनी मांडली. त्यांच्या मतदारसंघात तीन तालुक्यांसह पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचा काही भाग येत असल्याने सध्याची 5-6 कोटी रुपयांची तरतूद अपुरी पडते. प्रत्येक तालुक्यासाठी किमान 5 कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुळशी तालुक्यातील वाळेण पूल तसेच राजगड तालुक्यातील कोदवडी पूल आचारसंहिता लागण्यापूर्वी पडल्याने नागरिक, विद्यार्थी व शेतकर्यांची मोठी गैरसोय होत आहे. या पुलांसाठी अनुक्रमे 4 कोटी व 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबाबत स्व. अजितदादांनी निर्देश दिले होते. त्याची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी आमदार मांडेकर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली.





