Pune: फटाके स्टाॅल लिलाव प्रक्रियेत रिंग ?

पुणे – शहरातील फटाके विक्रीसाठी महापालिकेकडून नदीपात्रातील वर्तक उद्यानाच्या मागील बाजूस ४३ स्टाॅल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडून शुक्रवारी राबविण्यात आलेली आॅनलाइन लिलाव प्रक्रीयेत रिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या स्टाॅलसाठी लावण्यात आलेली जागा भाड्याची बोली एकाच संगणकावरून लावणात आल्याचे समोर आले आहे. तसेच, देऊ केलेल्या दरातही समानता आढळून आलेली आहे. परिणामी, यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान तसेच फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच महापालिकेने ही लिलाव प्रक्रीयाच रद्द केली आहे. दरम्यान, महापालिकेकडून शहरात १९४ ठिकाणी फटाके विक्रीस परवानगी देण्य़ात येणार आहे.
काय घडला प्रकार ?
महापालिकेकडून मागील वर्षांपासून फटाके स्टाॅलसाठी आॅनलाइन निविदा प्रक्रीया राबविली जाते. त्यातही वर्तक उद्यानाजवळच्या जागेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत असल्याने मागील वर्षी या ठिकाणच्या जागांच्या लिलावात महापालिकेस तब्बल ८४ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. तर काही स्टाॅल तब्बल दिड लाखांपर्यंत भाडे तत्वावर दिले गेले होते. त्यामुळे या वर्षीही उत्पन्न मिळण्याच्या आशेने महापालिकेने लिलाव प्रक्रीया राबविली. त्यासाठी स्टाॅलच्या जागेची किंमत २७ हजार निश्चित करण्यात आली.
मात्र, लिलाव सुरू झाल्यानंतर प्रत्येक स्टाॅलसाठी केवळ चार ते पाच हजार रूपयांचीच वाढीव बोली आली ही रक्कम ३० ते ३५ हजारांच्या आसपास होती. त्यामुळे प्रशासनस संशय आल्याने त्यांनी तांत्रिक तपासणी केली असता त्यात एकाच संगणकावरून एकाच आयपी अॅड्रेस वरून ही लिलावासाठी वेगवेगळ्या नावाने बोली लावण्यात आल्याचे समोर आले त्यामुळे संभाव्य नुकसानीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ ही प्रक्रीया रद्द करण्यात आली.





