पुणे – मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुळा- मुठा नद्यांचे पुनरुज्जीवन करून या नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून मुळा- मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येत आहे. सुमारे १४७३ कोटींच्या या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून ८४१ कोटी रूपयांचे अनुदान महापालिकेस दिले जाणार आहे. त्यानुसार महापालिकेने आतापर्यंत या प्रकल्पासाठी तब्बल ४१६ कोटी रुपयांचे काम केले असून, केंद्राकडून केवळ २५५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. महापालिकेकडून वारंवार या अनुदानासाठी पाठपुरावा केला जात असला, तरी निधी मिळण्यास उशीर होत असल्याचेच चित्र आहे. या प्रकल्पाअंतर्गत महापालिकेकडून शहरात ११ नवीन सांडपाणी शुद्धीकरण केंद्र् उभारली जाणार असून, त्यानंतर जुन्या आणि नवीन सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांच्या माध्यमातून १०० टक्के सांडपाणी शुद्ध करून ते नदीत सोडले जाणार आहे. हा प्रकल्प सुमारे १४७३ कोटींचा असून, प्रकल्प उभारणीसाठी ११७३ कोटींचा खर्च येणार आहे. याशिवाय देखभाल आणि दुरुस्तीसाठी ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात प्रकल्पासाठी केंद्रशासन ८४१ कोटींचे अनुदान महापालिकेस जपानच्या जायका कंपनीच्या माध्यमातून देणार आहे, तर प्रकल्प उभारणीचा उर्वरीत ३३२ कोटींचा खर्च महापालिका करणार आहे. या प्रकल्पात ३० टक्के बांधकाम असून, ७० टक्के मशिनरी आहेत. या प्रकल्पास केंद्राने २०१६ मध्ये मान्यता दिली असली, तरी प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम २०२१ मध्ये सुरू झाले होते. मात्र, करोना काळामुळे हे काम संथगतीने सुरू असल्याने केंद्र शासनाने महापालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर गेल्या दीड वर्षात महापालिकेकडून वेगाने काम सुरू असून, आतापर्यंत ४२१ कोटींचा खर्च करण्यात आला आहे, तर केंद्राकडून २५५ कोटींचा निधी मिळालेला आहे. त्यामुळे उर्वरीत निधीसाठी महापालिकेकडून केंद्रास वारंवार पत्रे पाठविली जात आहेत. आता निधीची गरज या प्रकल्पातील बांधकामाचा भाग जवळपास पूर्ण होत आला असून, आता त्यात मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री बसविली जाणार आहे. ही सामग्री परदेशातून येणार असून, त्यातील अनेक सामग्री निघालेली आहे. त्यामुळे ही सामग्री पोहोचताच संबधित कंपन्यांना महापालिकेस बिले द्यावी लागणार आहेत. महापालिकेकडून प्रकल्पाच्या टप्प्यानुसार अंदाजपत्रकात तरतूद केली आहे. मात्र, ही बिले देण्यासाठी तरतूद अपूरी आहे. त्यातच झालेल्या कामांसाठी ठेकेदारांकडून महापालिकेकडे तगादा लावण्यात येत आहे.