Pune : आरक्षणाची नियमावली जाहीर; सोडतीची तारीख अद्यापही अनिश्चित

पुणे – पुणे महापालिकेची प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण सोडतीची तारीख जाहीर करण्याआधी त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने नियमावली जाहीर केली आहे. नियमावलीसोबतच आरक्षण सोडत जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याबाबत आदेशात कोणतीही स्पष्टता आलेली नसल्याने इच्छुकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या नियमावलीनुसार आधी एसटी, एससी त्यानंतर ओबीसीचे आरक्षण काढले जाणार आहे, तसेच एक आरक्षण असलेल्या ठिकाणी चक्राकार पद्धतीने ते आरक्षण असणार आहे. महापालिकेची निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता असून, त्यापूर्वी प्रभागवार आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी पुनर्रचनेचे काम सुरू आहे.
प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गांसाठी आरक्षित प्रभागांची सोडत काढली जाते. या सोडतीतूनच कोणत्या प्रभागातून कोण उमेदवारी करू शकेल, तसेच घरातील पुरुष अथवा महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का, हे स्पष्ट होते. त्यामुळे इच्छुकांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.
ही सोडत दिवाळीपूर्वी निघण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, सोडतीची तारीख न आल्याने दिवाळीनंतर ही सोडत निघेल, अशी अपेक्षा होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला सोडतीसंदर्भातील नियमावली पाठवली असून, त्यानुसारच प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे आता सोडतीच्या तारखेसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
अशी असेल पुढील प्रक्रिया
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमावलीनुसार महानगरपालिका आयुक्त यांनी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. त्यात १) सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षित जागांची संख्या निश्चित करून प्रथम राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेणे. २) थेट आरक्षित होणाऱ्या जागांचे वाटप संबंधित प्रभागांमध्ये करणे. ३) प्रारूप आरक्षण सोडत काढून त्यावर हरकती व सूचना मागवण्यासाठी जाहीर सूचना देणे. ४) उर्वरित जागांचे आरक्षण सोडतीने निश्चित करणे. ५) सोडतीत निघालेले आरक्षण निश्चित पद्धतीने प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवणे. ६) प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षणाची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे.





