Pune : अर्थसंकल्पावर शिक्षणविषयक तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया

Union Budget 2025 :
यंदा केंद्राच्या अर्थसंकल्पात आयआयटी व मेडिकलच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. देशात ‘एआय’च्या अभ्यासासाठी तीन केंद्रे स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. उच्च शिक्षण व वैद्यकीय संशोधनाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. यात डिजिटल शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे.
– प्रा. डाॅ. गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी
केंद्र सरकार एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्सची स्थापना करून वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी करण्याच्या दृष्टीने पाऊल उचचले आहे. मात्र, राज्यातील विशेषत: शासकीय व अनुदानित शाळा व महाविद्यालयांतील शिक्षकांची भरती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित असला, तरी त्यासाठी केंद्र सरकारने तरतूद करायला हवी होती. शैक्षणिक संस्थांना देणगी देणाऱ्या व्यक्तींना आयकरातून सवलत मिळण्यासाठी पाऊल उचलणे अपेक्षित होते.
– ॲड. एस. के. जैन, अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळ
शिक्षणात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, या उद्देशाने अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. शालेय आणि उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमधील पुस्तके आणली जाणार आहेत. देशात 3 कृत्रिम बुद्धिमत्ता एक्सल्स सेंटर उभारण्यात येणार आहेत. सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल. कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) प्रशिक्षणासाठी उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली जातील. त्यासाठी 500 कोटी खर्चाची तरतूद, ही महत्त्वाची बाब आहे.
– राजेश पांडे, सदस्य, राज्य राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती
एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्सची स्थापना आणि आयआयटीचा विस्तार हे भारताला जागतिक नेतृत्व म्हणून स्थान देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आयआयटी आणि आयआयएससीमध्ये तांत्रिक संशोधनासाठी १० हजार फेलोशिपसह हे उपक्रम केवळ भारताच्या शैक्षणिक आणि संशोधन परिसंस्थेला बळकटी देतील. ७५ हजार नवीन जागांसह वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार ही बाब महत्त्वाची आहे.
– डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालिका, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ
भारतीय ज्ञान प्रणालींचे भांडार स्थापन करण्याची घोषणा स्वागतार्ह आहे. यामुळे प्राचीन भारतीय पारंपरिक ज्ञानाची देवाणघेवाण सोपी होईल, तसेच देशातील प्राचीन हस्तलिखितांचे संवर्धन करण्याची घोषणा देखील महत्त्वपूर्ण आहे.
– डॉ. प्रीती जोशी, प्राचार्या, लिबरल आर्टस, श्री बालाजी विद्यापीठ, पुणे





