Pune : शिक्षण विभागांतर्गत पदांच्या कामात फेरवाटप

पुणे – राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागांतर्गत मंजूर शिक्षण सहसंचालक, उपसंचालक संवर्गातील पदांचे कामाच्या आवश्यकतेनुसार फेरवाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळांतील शिक्षण उपसंचालक या संवर्गातील ९ विभागीय सचिवांच्या मंजूर पदे अन्य प्रमुख कार्यालयात वर्ग करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या आकृतीबंधात मंजूर असलेल्या सहसंचालक, उपसंचालक पदे वर्ग करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. केवळ अधिकारी यांच्या नियुक्त्या करुन कामकाजात गती प्राप्त होणार नाही. त्यासाठी अधिकारी यांच्या मदतीला आवश्यक कर्मचारी वर्गही उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.
विभागीय सचिव असलेल्या शिक्षण उपसंचालकांची शिक्षण आयुक्तालयात- ३ , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयात – २, प्राथमिक शिक्षण संचालनालयात – २, योजना शिक्षण संचालनालय – १, जनसंपर्क अधिकारी – १ याप्रमाणे नियुक्ती करण्यात येणार असून विभागीय मंडळातून विभागीय सचिव हे पदच गायब होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेमधील सहसंचालक या पदाचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळात (बालभारती) वर्ग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





