पुणे : पुण्यातील खराडी येथील हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टी प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर आयटी अॅक्टअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी महिलांसोबतच्या शारीरिक संबंधांचे गुप्तपणे व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा गंभीर आरोप पोलिसांनी ठेवला आहे. पोलिसांनी खराडीतील एका फ्लॅटवर छापा टाकून खेवलकर यांच्यासह पाच जणांना अटक केली होती. या कारवाईत कोकेन, गांजा, दारू, हुक्का आणि अश्लील साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय, “माल पाहिजे का?” असा सोशल मीडियावरील संदेशही पोलिसांनी पुरावा म्हणून ताब्यात घेतला आहे. खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्यावर नवीन गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल तपासाची मागणी केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, खेवलकर यांच्या मोबाइलमध्ये १,४९७ फोटो आणि २५२ व्हिडीओ आढळले, त्यापैकी २३४ फोटो आणि १९ व्हिडीओ अश्लील स्वरूपाचे आहेत. यामध्ये परप्रांतीय महिला आणि मोलकरणींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी खेवलकर यांच्यावर आयटी अॅक्टअंतर्गत नवीन गुन्हा नोंदवला असून, त्यांनी गुप्तपणे शारीरिक संबंधांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे अश्लीलता तसेच सायबर गुन्ह्यांचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.