पुणे – माणसाने कोठेही फेकलेल्या कचऱ्यामुळे भटक्या जनावरांसह दुर्मिळ पक्ष्यांचाही बळी जात आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत गिधाडाच्या पोटात काचेचे तुकडे सापडले. दुर्दैवाने हे गिधाड मृत्युमुखी पडले. कचऱ्याचे ढीग, त्यात अनेक प्रकारचा मिसळलेला कचरा, प्लॅस्टिक, काच आणि अनेक गोष्टींचा समावेश असलेल्या कचरा गावांमध्ये, गावाच्या बाहेर पाहायला मिळतो. शहरांमध्ये झीरो गार्बेज प्रणाली आणली जात आहे. मात्र अद्यापही ती पूर्णत्त्वाला गेली नाही. ग्रामीण भागात तर या कचऱ्याचे अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळते. ग्रामीण भागात एकवेळ वीज, पाणी पोहोचले नसेल; परंतु प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह वस्तू पोहोचल्या आहेत. त्याचाच धोका तेथील प्राण्यांना आणि पक्ष्यांना बसत आहे. नाशिकच्या वन्यप्राणी उपचार केंद्रात नुकतेच एक गिधाड दाखल झाले. अत्यंत त्रासलेले, जखमी झालेले आणि भिजलेल्या अवस्थेत या गिधाडाला या केंद्रात आणण्यात आले. त्याच्या पोटात संसर्ग झाला होता. त्याच्या यकृतात बिघाडही झाला होता. त्याचा एक्सरे काढला असता, अत्यंत धक्कादायक गोष्ट आढळली. त्याच्या अन्ननलिकेत आणि पोटात काचेचे तुकडे आढळले. या काचेमुळे त्याच्या अन्ननलिकेपासून, आतड्यांपर्यंतचा सर्व भाग फाटला होता आणि आतून त्याला अंतर्गत रक्तस्राव झाला होता. ते रक्त गोठले होते. त्याच्या विष्ठेतही काचेचे तुकडे आढळले. या गिधाडाला वाचवण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र. दुर्दैवाने ते मृत्युमुखी पडले. गिधाड हा पक्षी अत्यंत दुर्मिळ पक्ष्यांमध्ये मोडतो. जंगलात किंवा शहराच्या आजूबाजूला पडलेल्या मृतप्राण्यांच्या शवांवर यांची गुजराण होते. या पक्ष्याला सफाई कामगारही म्हणतात; परंतु वाढते शहरीकरण, नष्ट होणारी जंगले यामुळे या पक्ष्यांचे खाद्य त्यांना मिळेनासे झाल्याने त्यांची संख्या घटत आहे. जे काही पक्षी शिल्लक आहेत, ते गावकुसाबाहेर कचऱ्याच्या स्वरूपात टाकलेल्या अन्नावर गुजराण करत आहेत. या कचऱ्याच मांसाचे तुकडे सापडले, तर हे पक्षी त्याकडे आकर्षित होतात आणि ते मांस खातात. मात्र, त्या मांसाबरोबरच त्या पक्षांच्या शरीरात प्लॅस्टिक पिशव्या, काच असे प्रकार जात आहेत. त्या मांसात असे प्रकार मिसळले गेले, तर त्या पक्ष्यांना त्यापासून धोका निर्माण होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या गिधाडाला आपला जीव गमवावा लागला.