Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रभारी राज!

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सर्वच्या सर्व चारही अधिष्ठाता पदे प्रभारीच आहेत. त्याप्रमाणेच विद्यापीठाचे प्रशासकीय प्रमुख असलेले कुलसचिवपदही प्रभारीच आहे. विद्यापीठातील महत्त्वाची सर्व पदे प्रभारी असून, सर्वत्र प्रभारी कामकाज सुरु आहे. सर्व पदे भरण्यास विद्यापीठाकडून दिरंगाई केली जात आहे. ही पदे का भरली जात नाहीत याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. यशोधन मिठारे यांच्याकडील प्रभारी अधिष्ठाता पदाची जबाबदारी विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुप्रिया पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यावरुन अधिष्ठाता पदाच्या प्रभारी कामकाजावरुन विद्यापीठात चर्चा सुरु आहे. याबाबत अधिसभा सदस्य डाॅ. हर्ष गायकवाड यांनी कुलगुरु डाॅ. सुरेश गोसावी यांच्याकडे प्रभारी पदावर असलेल्या अधिष्ठातांची तक्रार केली होती. त्यावरुन अधिष्ठाताची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
डॉ. हर्ष गायकवाड यांनी विद्यापीठाला दिलेल्या पत्रानुसार पुणे विद्यापीठात सर्व अधिष्ठाता पदे हे प्रभारीच आहेत. तसेच, ही प्रभारी पद हे त्यांचे मूळ पदाचा कार्यभार सांभाळून करावयाचे आहे. त्यांनी त्यांचा दिवसभराचा मूळ कार्यभार संपल्यानंतर त्यांना दिलेल्या प्रभारी अधिष्ठातापदास न्याय देणे गरजेचे आहे. मात्र काही अधिष्ठाता विद्यापीठाच्या बहुतांश समित्यांवर असल्याचे दिसून येत आहे. यावरुन प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यापूर्वी अधिष्ठाता पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर अधिष्ठाता पदासाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे पूर्वीची अधिष्ठाता पदाची सर्व प्रक्रिया रद्द करावी लागली. सुधारित जाहिरात कधी प्रसिद्ध केली जाणार आहे, तसेच कुलसचिव हे पद आणखी किती दिवस प्रभारी ठेवणार, याबाबत विद्यापीठाकडून कार्यवाही करणार आहे, यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.





