Rain update Pune : पुण्यात पावसाने रचला नवा विक्रम! मागच्या १० वर्षांपेक्षा मे महिन्यात तब्बल ‘इतक्या’ पावसाची नोंद

Rain update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान पाहायला मिळत असून, पुढील ४८ तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, मंगळवारी पुण्यात अवकाळीने पावसाने कहर केला. या मान्सूनपूर्व पावसाने दहा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला असून, पुण्यात १ ते २१ मे दरम्यान ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी मे २०१५ मध्ये १०६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.
पुण्यात मे महिन्यात सरासरी ३१. ४ मिमी पाऊस पडतो. मात्र, आठवडाभर पडलेल्या आणि मंगळवारी मुसळधार कोसळळेल्या पावसाने शंभरी पार केली आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. चिंचवडमध्ये पावसाने एकाच रात्रीत तब्बल १०१ मिमी पावसाची नोंद करत नवा विक्रम केला आहे. यामुळे पुढील काही दिवस पाऊस असाच राहिला तर अनेक विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
मंगळवारी पुणे शहरासह जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, बुधवारी सकाळपासून वातावरण जरी ढगाळ झाले असले तरी पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे उकाडा वाढताना दिसत आहे. मंगळवारी शहरातील बावधन, बाणेर, कोथरूड, सिंहगड रस्ता, कात्रज, आंबेगाव, सहकारनगर या भागात सुरू झालेला पाऊस हळूहळू शहरातील इतर भागांतही पडला. यामुळे विविध भागांतील मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. तर काही ठिकाणचा वीजपुरवठा देखील बंद करण्यात आला होता.
यामुळे मध्यमहाराष्ट्रात मुसळधार
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्राला अॅारेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार दिवस हे पावसाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. कनार्टक किनारपट्टीच्या बाजूला अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. हे बाष्प जमिनीच्या दिशेने येत आहे. यामुळे मध्य महाष्ट्रात आणि कोकणात वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळत आहे.





