Pune Rain: पुण्यात मान्सूनचा ‘धडाका’! ३-४ तासांच्या संततधारेने पुणेकरांची उडाली धांदल
Pune Rain: फर्गसन रस्ता, स्वारगेट आणि कोथरूड परिसरात वाहनचालक आणि पादचाऱ्यांची तारांबळ; अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना.

Pune Rain – जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी शहर आणि उपनगरांमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली. पहाटेपासूनच विविध भागांत पावसाची रिमझिम सुरू होती. दुपारनंतर सुरू झालेल्या संततधार पावसाने पुणेकरांची धांदल उडवली. दुपारी एकनंतर सुरू झालेला पाऊस तीन ते चार तास कमी-अधिक प्रमाण पडल्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले. काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
सायंकाळपर्यंत शिवाजीनगर परिसरात ११ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील गिरीवन येथे सर्वाधिक ३५ मिमी पाऊस झाला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पुणे जिल्ह्यात दाखल झाला. मात्र समाधानकारक पाऊस झाला नाही. मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी स्थानिक पातळीवरील हवामान बदलामुळे पावसाच्या हलक्या सरी पडल्या. बुधवारी (दि. १) पहाटेपासून पावसाला सुरवात झाली.
काहीवेळ रिमझिम पाऊस झाल्यानंतर विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा गायब झाला असे वाटले. मात्र, बुधवारी दुपारी एकनंतर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाची सुरू झालेली संततधार दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत कायम होती. खऱ्या अर्थाने मान्सूनच्या पावसाचा अनूभव घेता आला. सायंकाळी पाचनंतर शहराच्या मध्यवर्ती भागात पावसाने विश्रांती घेतली,
मात्र उपनगरातील काही भागात अधून-मधून हलक्या सरी पडत होत्या. दुपारी झालेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे फर्गसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, सातारा रस्ता आणि स्वारगेट परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. दुपारी सुरू झालेला पाऊस बराचवेळ पडत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. कोथरूड, सिंहगड रस्ता, हडपसर,
वानवडी, पाषाण, औंध, कल्याणीनगर आणि पिंपरी-चिंचवड या उपनगरांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने शहराती कमाल तापमानात लक्षणीय घट झाली असून, आज कमाल तापमान ३० अंशाच्या खाली आले. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
संततधारेमुळे अनेक ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्या. अभिनव चौकातील अक्षरधारा बुक गॅलरीजवळ एक मोठे झाड उन्मळून पडले, यावेळी पदपथावर उभी असलेली एक मुलगी बचावली. वर्तक बागेशेजारी एक झाड पडले, सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी झाड बाजूला करून वाहतुक सुरळीत केली. पावसामुळे रस्त्यावरील वाहतुक मंदावली.
बुधवारचा पाऊस
चिंचवड १३, पाषाण १२, शिवाजीनगर ११, दापोडी १०, तळेगाव ९, एनडीए ८, राजगुरूनगर-माळीण ६, हडपसर ५, शिरूर-दौंड २, गिरीवन – ३५, भोर २१ मिमी





