Pune Rain: पुणेकरांनो सावधान! २४ तासांत पावसाने घेतली विश्रांती, पण पुढील ४८ तास महत्त्वाचे
Pune Rain: मान्सूनच्या आगमनानंतर पुण्यात पावसाचा लपंडाव सुरू; दुपारनंतर ऊन पडल्याने पुणेकर अवाक, मात्र घाटमाथ्यावर पावसाची संततधार कायम.

Pune Rain – मान्सूनने तीन दिवसांत पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मान्सूनच्या वेगवान आगमनामुळे काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी हलक्या सरी पडत आहेत. मान्सूनच्या आगमनानंतर शहरात पाऊस दिवसाआड हजेरी लावतोय, असे दिसते. गेल्या २४ तासांतील दमदार आगमनानंतर बुधवारी (दि. २४ जून) सकाळी शहर आणि उपनगरांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दुपारनंतर तर पावसाने विश्रांती घेतली.
पुण्यात २१ जून रोजीच्या पूर्वमोसमी जोरदार बॅटिंग केली. त्यानंतर, २२ जून रोजी मान्सूनचे अधिकृत आगमन झाले. २३ जून रोजी पावसाने पुन्हा शहरात दमदार पुनरागमन केले आणि अनेक भागांना झोडपून काढले. रात्री उशीरापर्यंत पावसाची संततधार सुरू होती. बुधवारी (दि. २४ जून) सकाळीही पाषाण, शिवाजीनगर, एनडीए, चिंचवड, हवेली परिसरात पाऊस झाला.
शहरात दाट ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाचा जोर वाढेल असे वाटत असताना दुपारनंतर हवामानात अचानक बदल झाला. आकाशातील काळे ढग गायब झाले आणि आकाश निरभ्र झाले. दुपारनंतर हलके ऊन पडल्यामुळे पावसाने दडी मारली. जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि दुर्गम भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मान्सून सक्रिय झाल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून,
उकाड्यापासून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. रबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुढील ४८ तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळी पाषाण पारिसरात ८, शिवाजीनगर आणि एनडीए परिसरत ५, चिंचवड आणि हवेली येथे प्रत्येकी २, तर दापोडी येथे १.५ मिमी पावसाची नोंद झाली.





