Pune Rain Alert: पर्यटकांनो काळजी घ्या! घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; वेधशाळेकडून रेड/ऑरेंज अलर्ट जारी
Pune Rain Alert: विकेंडला पर्यटनस्थळी जाणाऱ्या नागरिकांना प्रशासनाचे आवाहन; धबधबे आणि घाट रस्ते परिसरात विशेष काळजी घेण्याच्या सूचना.

Pune Rain Alert – शहर आणि उपनगरांमध्ये गुरुवारपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी ग्रामीण भाग आणि घाटमाथ्यावर जोर कायम आहे. पुढील २४ तासांत पुणे जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून घाट परिसरातील स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाने अंशतः विश्रांती घेतली आहे. दिवसभर आकाश पूर्णपणे ढगाळ असून, अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी पाच वाजेनंतर शहराच्या अनेक भागांत रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे रात्रीच्या वेळी शहरातील तापमानात घट होऊन हवेतील गारवा वाढला आहे.
पुढील २४ तासांत शहरात अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे. शहराच्या तुलनेत जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला. त्यामध्ये विशेषतः भोर, कुरवंडे, निमगिरी आणि माळीण या भागांत मुसळधार सरी कोसळल्या असून, तिथे १५ ते २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुढील २४ तासांत घाटमाथ्यावरील बहुतांश भागांत जोरदार ते मुसळधार पाऊस होणार असल्याने नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकेंडच्या पार्श्वभूमीवर लोणावळा, महाबळेश्वर, ताम्हिणी घाट किंवा धबधब्यांच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांनी विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





