Mahabaleshwar Police: महाबळेश्वर पोलिसांची धडक कामगिरी! हरवलेले १४ मोबाईल अन् २.२५ लाख नागरिकांना परत
Mahabaleshwar Police: सायबर फसवणुकीतील ५ तक्रारदारांचे २ लाख २५ हजार रुपये वसूल; एकूण ५ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत.

Mahabaleshwar Police – महाबळेश्वर पोलीस ठाण्याने तांत्रिक तपास आणि तत्पर कारवाईच्या बळावर नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवत हरवलेले 14 मोबाइल (किंमत 3 लाख 22 हजार) आणि ऑनलाइन फसवणुकीतील 2 लाख 25 हजार अशी एकूण 5 लाख 47 हजारांची मालमत्ता व रक्कम संबंधित तक्रारदारांना परत मिळवून दिली आहे. महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,
अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच वाई उपविभागीय पोलीस अधिकारी, सुनील सांळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी विशेष शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने उएखठ पोर्टल आणि इतर आधुनिक तांत्रिक साधनांच्या सहाय्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांतून हरवलेले मोबाइल शोधून काढले.
छउठइ पोर्टलवर प्राप्त ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारींचा पाठपुरावा करून पाच तक्रारदारांचे 2.25 लाख परत मिळवून दिले. यापुढेही हरवलेले मोबाइल शोधणे आणि ऑनलाइन फसवणुकीतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी अशाच प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी दिली.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सांळुखे आणि पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. परजणे, रुपाली काळे, वैभव भिलारे, शंकर गलांडे आणि बाळू भागरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.





