Pune Rain Alert: पुणेकरांनो सावधान! पुढील ४८ तास अत्यंत धोक्याचे; वेधशाळेने दिला ‘हा’ मोठा इशारा
Pune Rain Alert: पुणे शहर आणि जिल्ह्यात मान्सूनचा धमाका; सलग दोन दिवस कोसळणाऱ्या संततधारेमुळे रस्ते जलमय.

Pune Rain Alert – शहर आणि जिल्ह्यात १ जुलैपासून मान्सूनने जोरदार आगमन झाले आहे. गेल्या २४ तासांत पावसाचा जोर वाढला असून, सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. २) शहरासह उपनगरात झालेल्या पावसाने रस्ते जलमय केले. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाली. पुढील ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली असून, दि. ३ जुलै रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज,
तर दि. ४ जुलै रोजी रेड अलर्ट वेधशाळेने दिला आहे. महाराष्ट्रासह देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत मान्सूनने जवळपास संपूर्ण देश व्यापला असून, पुढील ४८ तासांत तो उर्वरित भारतामध्येही पूर्णपणे दाखल होण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण आहे. या हवामान बदलांमुळे मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यातच पावसाचा जोर वाढताना दिसत आहे.
दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्वच उपनगरांमध्ये गुरुवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. क्षणभराची विश्रांती घेत येणाऱ्या हलक्या ते मध्यम सरींमुळे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. हंगामात पहिल्यांदाच कमाल तापमान एवढ्या खाली आले असून, शहरातील उकाडा गायब झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या वेळी हवेतील गारव्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून,
खऱ्या अर्थाने मान्सूनला सुरवात झाली. शिवाजीनगर, पाषाण, एनडीए, चिंचवड आणि हवेली या सर्वच भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. परिणामी शहरातील वाहतुक मंदावली असून, सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी विद्यार्थ्यांसह कार्यालयातून घरी जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीत अकडून राहावे लागले.
गुरुवारी सायंकाळपर्यंत झालेला पाऊस
गिरीवन २६, भोर १७, चिंचवड आणि निमगिरी ११, पाषाण १०, शिवाजीनगर आणि माळीण ८, तळेगाव ६, दापोडी ५, एनडीए आणि राजगुरूनगर ३, बालेवाडी आणि शिरूर २ मिलिमीटर.
घाटमाथ्यावर झालेला पाऊस
भिरा २३१, ताम्हिणी १३५, दावडी ११६, डोंगरवाडी ११४, शिरगाव १०७, लोणावळा ९७, वळवण ८१, मुळशी ३२ मिलिमीटर






