Maval News : लोणावळा ते कान्हे… मावळच्या सरकारी रुग्णालयांचे रुपडे पालटणार; काय आहेत नव्या सूचना?
Maval News : आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत कान्हे येथे आढावा बैठक; तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणावर भर.

Maval News – राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. मावळ तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सुनील शेळके उपस्थित होते. बैठकीपूर्वी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या सुरू असलेल्या इमारतीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत उर्वरित काम तातडीने पूर्ण करून रुग्णालय लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या बैठकीत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालयांतील रिक्त पदे, औषधांचा पुरवठा, अद्ययावत वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता तसेच प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
दुर्गम भागातील नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आवश्यक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला. गोरगरीब जनतेला मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच ही रुग्णालये लवकरात लवकर कार्यान्वित करावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.





