प्रभात वृत्तसेवा पुणे – हडपसर रेल्वे टर्मिनलचे काम अंतीम टप्यात आले असून २६ जानेवारी पासून नांदेड आणि हरंगुल एक्स्प्रेस या रेल्वे पुणे स्थानकाएवजी हडपसर टर्मिनल येथून सुटणार आहे. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होणार असून टप्यटप्याने आणखी रेल्वे हडपसरवरून सोडण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.पुणे स्थानाकाला पर्याय हडपसरचा विकास करण्यात येत आहे. हडपसर रेल्वे टर्मिनलचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या नियमित, विशेष अशा १२ गाड्या येथून सोडण्यात येत आहेत. तसेच, १० गाड्यांना थांबा दिला आहे. पुणे रेल्वे स्थानकाचा विकास आणि रिमॉडलिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील काही गाड्या हडपसर, खडकीतून सोडण्यात येणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या नांदेड, हरंगुल या दररोज धावणाऱ्या गाड्या हडपसर येथून सोडण्याचा निर्णय झाला आहे. प्रवाशांची सोय आणि वाहतुकीत सुधारणा यासाठी हा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक १७६२९ हडपसर – हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस दररोज रात्री नऊ वाजून ५० मिनिटांनी हडपसर येथून निघेल. गाडी क्रमांक १७६३० हजूर साहिब नांदेड – हडपसर एक्सप्रेस पहाटे चार वाजून ३५ मिनिटांनी हडपसरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४८७ हडपसर – हरंगुल स्पेशल दररोज सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी हडपसर येथून निघेल तर गाडी क्रमांक ०१४८८ हरंगुल – हडपसर स्पेशल रात्री पावणेनऊ वाजता हडपसरला पोहोचेल. या गाडीला लोणी, उरुळी, यवत, केडगाव, पाटस आणि दौंड कॉर्ड लाईन येथे थांबे आहेत.