पुणे रेल्वेची २२ कोटींची बचत; एचओजी प्रणालीमुळे २५ केव्ही वीजनिर्मिती
पुणे : इंधनाची बचत करण्यासाठी मध्य रेल्वेने मेल आणि एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये हेड-ऑन जनरेशन (एचओजी) पद्धतीचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात पुणे विभागात २२ कोटी रुपयांच्या इंधनाची बचत झाली आहे. या पद्धतीत गाडीच्या इंजिनला एचओजी कन्व्हर्टर लावून त्याद्वारे २५ केव्ही विजेची निर्मिती केली जाते, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मेल, एक्स्प्रेस गाडीत निर्माण होणाऱ्या विजेबरोबरच ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाइन्स (ओएचई) मधून मिळणाऱ्या विजेद्वारे पूर्ण रेल्वे गाड्यांमध्ये एसी, लाइट आणि पंख्यांना विजेचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे एक्स्प्रेसमध्ये आता वीजनिर्मितीसाठी जनरेटर कारची गरज भासत नाही, तसेच तिच्या माध्यमातून होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासही मदत झाली आहे.
यापूर्वी एक्स्प्रेसमध्ये जोडण्यात येणाऱ्या आयसीएफ कोचमध्ये अल्टरनेटर यंत्राद्वारे वीजनिर्मिती केली जात होती. त्यानंतर आलेल्या अद्ययावत एलएचबी कोचमध्ये हे यंत्र काढून टाकण्यात आले. त्यामुळे रेल्वेला आर्थिक फायदा होत आहे.
प्रदूषणावर मात
विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी ईओजी पद्धतीचा वापर करून एक्स्प्रेसच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन जनरेटर कार जोडण्यात येऊ लागल्या. यामध्ये जनरेटरमधील डिझेल इंजिनला अतिरिक्त इंधनाची गरज भासत असल्याने धूर आणि ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत होता. नव्या प्रणालीत एचओजी कन्व्हर्टरमुळे ती समस्या दूर झाली आहे.





