Pune : घरात चाललेल्या हुक्का पार्टीवर छापा

पुणे – स्वारगेट पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा महर्षीनगरमधील एका घरात सुरू असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्टीवर छापा टाकत तिघा तरुणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळी हुक्का पॉट, विविध तंबाखू फ्लेवर्स, कोळसा आणि इतर साहित्य जप्त केले. त्यांच्याविरुद्ध सिगारेट आणि तंबाखू उत्पादन अधिनियम तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
विराज गौतम जैन (३१, रा. दत्तवाडी), सिद्दील राजेंद्र देसरडा (३०, रा. गोखले पार्क, चिंचवड) आणि हार्दिक संदीप लुनावत (२८, रा. कोथरूड) अशी आरोपींची नावे आहेत. स्वारगेट पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुजारी गार्डनसमोरील वर्धमान लॉजच्या समोरील एका घरावर छापा टाकण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक बी. पी. शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. छाप्यात तीन तरुण हुक्का पीत असल्याचे आढळून आले. आरोपी विराजने सांगितले की, हे घर त्याचे नातेवाइक संदीप लुनावत यांचे असून, तो येथे मित्रांसोबत अधीमधी हुक्का पिण्यासाठी येतो. छाप्यादरम्यान सुमारे ६८४० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी जप्त केलेले साहित्य पंचनामा करून प्रयोगशाळेत पाठवले आहे. तसेच हे घर नियमितपणे हुक्का पार्टीसाठी वापरले जात होते का आणि यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? याची चौकशी सुरू आहे.





