pune : महापालिका सर्व्हरमधील डेटा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
pune :

मिळकतकर विभागातील हार्डडिस्कची चोरी
पुणे – महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातील सर्व्हर रूममधून यूएसबी ४ टीबी क्षमतेची हार्डडिस्क चोरीला गेल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पुणेकरांच्या डेटाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
मिळकतकर विभागाची संवेदनशील माहिती चोरी झाली असल्याने त्याचा गैरवापर झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या हार्डडिस्कमध्ये स्कॅन डाॅक्युमेंट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चोरी गेलेली कागदपत्रे नेमकी कोणाची व कशासाठी चोरी केली, याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत.
कर आकारणी व कर संकलन विभागाच्या सर्व्हर रूममधील हार्डडिस्क गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करण्यात आला. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या ठेकेदाराकडील एका कर्मचाऱ्याने हार्डडिस्क काढून नेल्याचे तपासात स्पष्ट झाले असल्याने कर संकलन विभागाने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
जबाबदारी घेणार कोण
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित करत मालमत्ता कराशी संबंधित माहिती, नागरिकांची वैयक्तिक माहिती आणि विभागातील इतर संवेदनशील डेटा सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित केला.
डेटा बाहेर गेला असल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणा काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त रवी पवार यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात आला असून, हार्डडिस्क परत मिळाल्याचे सांगितले. मात्र, ती रिकाम्या अवस्थेत मिळाल्याने डेटा पुनर्प्राप्तीचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
गैरवापर झाला का?
ही हार्डडिस्क रिकामी करून परत देण्यात आल्याने मूळ माहितीची प्रत तयार करण्यात आली होती का, डेटा इतरत्र हलविण्यात आला का किंवा त्याचा कोणताही गैरवापर झाला आहे का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी सभागृहात करण्यात आली. मात्र, प्रशासनास त्यावर स्पष्ट खुलासा करता आला नाही.





