Pune : पुणे विद्यापीठाची प्रवेश मुदतवाढ

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील पदवी, पदव्युत्तर आणि एकात्मिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी ३० एप्रिलपर्यंत, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी २० मे पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ संकुलात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठी आतापर्यंत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा यापूर्वी मे-जूनमध्ये होत असत. मात्र, विद्यार्थी व पालकांची मागणी आणि नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी विचारात घेऊन यंदा लवकर प्रवेश परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले. त्यानुसार दि. १२ फेब्रुवारीपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज मागविण्यास सुरुवात केली. विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यापीठाकडून अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यापीठातर्फे पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दि. १५ मे रोजी, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा दि. ३ ते ५ जुन दरम्यान घेतली जाणार आहेत. पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रतेचे निकष आणि प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.




