Pune : पोर्शेप्रकरणी पुणे पोलिसांना धक्का

पुणे – कल्याणीनगर पोर्शे अपघातप्रकरणी पुणे पोलिसांना धक्का बसला आहे. अपघातात दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या १७ वर्षीय चालकावर अल्पवयीन म्हणूनच बाल न्याय कायद्याअंतर्गत बाल न्याय मंडळापुढेच हा खटला चालवला जाईल. पुणे पोलिसांनी चालकावर प्रौढ किंवा सज्ञान म्हणून खटला चालवावा, यासाठी केलेला अर्ज मंडळाने फेटाळला आहे. आरोपी घटनेवेळी अल्पवयीन होता. त्यामुळे त्याच्यावर प्रौढ म्हणून खटला चालवणे आणि शिक्षा देणे योग्य ठरणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
१९ मे २०२३ रोजी रात्री अडीच वाजता कल्याणीनगरला ही दुर्घटना घडली होती. महागड्या पोर्शे कारने दोन दुचाकीस्वार संगणक अभियंत्यांना जबर धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले, की अपघातावेळी वाहन चालवणारा आरोपी १७ वर्षांचा होता. त्याने आधी पबमध्ये मद्यपान केले होते. त्यामुळे आरोपीला प्रौढ घोषित करून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार खटला चालविण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज केला होता.
विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी आरोपीला सज्ञान समजून त्याच्यावर प्रौढांप्रमाणे खटला चालवावा, अशी मागणी केली होती. पोलिसांनी काही महत्त्वाचे पुरावेही सादर केले होते. त्यात सीसीटीव्ही फुटेज, मद्यपानाचे पुरावे आणि ससूनमधील रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न याचा समावेश होता.
हे सर्व आरोपीचे गंभीर वर्तन दर्शवणारे असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. आरोपीच्या बाजूने वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद करताना सांगितले, की आरोपीकडून नकळत अपघात घडला असून, त्याचे कोणतेही पूर्वगुन्हेगारी वर्तन नव्हते, तसेच आरोपीला सुधारण्याची संधी देऊन त्याच्यावर बाल न्याय कायद्याच्याच तरतुदीनुसार खटला चालवावा. बाल न्याय मंडळाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत पुणे पोलिसांचा अर्ज फेटाळला.





