pune : चोवीस तास पाण्यासाठी प्रायोगिक मीटर रीडिंग
pune :

योजनेचे ८८ टक्के काम पूर्ण; योजना पूर्ण झाल्यानंतरच पाणीपट्टी आकारणी
pune : शहरातील चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. पाणीपुरवठ्याच्या १४४ झोनपैकी ६० झोनमध्ये टाक्या, पाइपलाइन आणि मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती एल एँड टी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर पाण्याचे मोजमाप करण्यासाठी पुढील महिन्याभरात काही झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मीटर रीडिंगचे काम सुरू करण्यात येणार असून, डमी बिले तयार करण्यास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी दिली.
शहरातील पाणी गळती रोखण्यासाठी आणि सर्व भागात चोवीस तास समान पाणी वाटप करण्याची सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची चोवीस तास पाणीपुरवठा योजना महापालिकेने हाती घेतली. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे काम ११ वर्षांत ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. या योजनेसाठी महापालिकेने पाण्याच्या दरात वाढ केली असून, मीटरद्वारे पाण्याचा वापर निश्चित करून गळती कमी करण्याचे नियोजन आहे.
या योजनेअंतर्गत ८३ पाण्याच्या टाक्या आणि सुमारे एक हजार किलोमीटरच्या नवीन पाइपलाइनसह पावणेतीन लाख पाणी मीटरही बसविण्यात येणार आहेत. जागेच्या अडचणीमुळे टाक्या आणि पाइपलाइनच्या कामाला विलंब झाला, तसेच अनेक ठिकाणी मीटर बसविण्याला नागरिकांनी विरोध केल्याने काम थांबले आहे.
पाण्याच्या ८३ पैकी ६३ टाक्या कार्यान्वित झाल्या असून, येत्या १० तारखेपर्यंत आणखी १६ टाक्या कार्यन्वित होतील. काही ठिकाणी पाइपलाइनसाठी जागा मिळविण्यात अडचणी येत आहेत, ते सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मीटरलाही काही ठिकाणी विरोध होत असल्याने विलंब होत आहे. पाणीपुरवठ्याच्या १४४ झोनपैकी ६० झोनमधील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. याची देखभाल दुरुस्ती हा प्रकल्प करणार्या एल एँड टी कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. या ६० झोनमध्ये मीटर रीडिंगची यंत्रणाही विकसित करण्यात येत आहे.
पुढील महिन्यापासून काही झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मीटर रीडिंग घेऊन बिले तयार करण्यात येणार आहेत. या बिलांवरून पाणी वापराचा अभ्यास करण्यात येईल. मात्र, संपूर्ण योजना पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्षात आकारणी सुरू होईल.
– पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त





