pune : एक लाख १७ हजार प्रवाशांचे आरक्षण
pune :

मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी धावणार २६२ विशेष गाड्या
Pune: लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेने २६२ गणपती विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथून सुटणाऱ्या या गाड्यांमध्ये २०० आरक्षित (सावंतवाडी, रत्नागिरी, मडगाव) आणि ६२ अनारक्षित सेवांचा समावेश आहे. दि. ९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या गाड्यांसाठी आतापर्यंत १ लाख १७ हजार ६८२ प्रवाशांनी आरक्षण केले आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांना अर्धा तास आधी स्थानकावर पोहोचण्याचे आणि वैध तिकिटासह प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वेने आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही प्रकारच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये २६२ विशेष गाड्यांच्या वर्गीकरणात २०० आरक्षित विशेष गाड्यांमध्ये पूर्ण वातानुकूलित, वातानुकूलित, स्लिपर आणि सामान्य डब्यांच्या (जनरल) गाड्यांचा समावेश आहे. ६२ अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. आरक्षित २०० फेऱ्यांपैकी सर्वाधिक ११२ फेऱ्या सावंतवाडी मार्गावर धावतील.
रत्नागिरीसाठी ६४ फेऱ्या आणि मडगावसाठी २४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गणपती विशेष गाड्यांच्या वेळा, मार्ग आणि थांब्यांच्या सविस्तर माहितीसाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीईएस ॲपचा वापर करावा. प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी स्थानकावर पोहोचावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रवासादरम्यान होणारी गैरसोय आणि दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी केवळ वैध तिकिटासह प्रवास करावा. ओळखपत्र सोबत ठेवा. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेने अतिरिक्त तिकीट खिडक्या, प्रतीक्षा क्षेत्रे आणि रांग व्यवस्थापन प्रणालीसारख्या विशेष उपाययोजना केल्या आहेत. याशिवाय स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मोफत पाणी- अन्नपुरवठा आणि सुरक्षेसाठी अतिरिक्त आरपीएफ जवान तैनात करण्यात आल्याचे, रेल्वे प्रशासनाने सांगितले.





