Pune | पुणे विमानतळ प्रवासी वाहतुकीमध्ये देशात नवव्या क्रमांकावर

पुणे – पुणे विमानतळ प्रवासी वाहतुकीमध्ये ऑक्टोबर 2024 या महिन्यांत देशात नवव्या क्रमांकावर आले आहे. ऑक्टोबर महिन्यात पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत असे एकुण आठ लाख 59 हजार 229 प्रवाशांनी प्रवास केला. ही प्रवासीसंख्या देशातील इतर विमानतळांच्या तुलनेत नवव्या क्रमांकाची आहे.
पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू झाल्यामुळे पुणे विमानतळावरून उड्डाणे वाढत आहेत. या ठिकाणी विविध विमान कंपन्यांकडून सेवा सुरू झाली आहे. प्रवाशांना सुविधा पुरवण्यात येत असल्याने पुणे विमानतळ जगात 76 क्रमांकावरून 74 व्या क्रमांकावर पोहोचले आहे. विमानतळ प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार आता प्रवासी वाहतुकीतही पुणे विमानतळ नवव्या क्रमांकावर आले आहे. धावपट्टीचा विस्तार झाल्यानंतर विमान कंपन्यांकडून आणखी नव्या मार्गांवर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याने पुणे विमानतळाच्या क्रमावारी चांगली सुधारेल. असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला .
प्रवासी संख्या वाढली…
पुणेकरांचा विमानप्रवास व्यावसाय, नोकरी तसेच पर्यटन यामुळे अधिक प्रमाणात वाढला आहे. तसेच, पुणे येथून मालवाहतूकही होत असल्याने या माध्यमातूनही विविध देशांत जाणे-येणे वाढलेआहे. या सर्वांमध्ये मागील काही वर्षांच्या तुलनेत 2024 मध्ये पुणे विमानतळावर प्रवासी सेवेत वाढ झाली आहे. समाधानकारक तसेच सुरक्षित प्रवासी सेवा पुरवण्यात पुणे विमानतळाने जगात नुकताच 74वा क्रमांक पटकावला आहे. प्रवासीसंख्येत नववा क्रमांक मिळाला आहे.





